"एकाकी अश्रूंची कहाणी"

"एकाकी अश्रूंची कहाणी"

अश्रू... या दोन थेंबांमध्ये संपूर्ण भावना सामावलेल्या असतात. कधी दुःखाचे, कधी वेदनेचे, तर कधी एकटेपणाचे प्रतिबिंब असणारे हे अश्रू कधीच खोटे नसतात. ते कुणालाही फसवत नाहीत, कुठलाही आव आणत नाहीत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांचा साक्षीदार फक्त मन असतं.

तहानलेल्या डोळ्यांतून निघणारे हे अश्रू अनेकदा बाहेरून कोणीच पाहत नाही, पण आतल्या आत मनाची प्रत्येक भिंत ओलसर करून जातात. बाहेरच्या जगाला कधीच कळत नाही की हे अश्रू कशासाठी ओघळतात, कुणासाठी सांडतात, किंवा त्यांच्यामागे कोणती वेदना दडली आहे.
आपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात, जेव्हा आपण स्वतःलाच समजून घ्यायचं असतं. अशा वेळी समोर कुणी नसतं, फक्त आपण आणि आपलं मन असतं. त्या क्षणी साक्षीदार असतो तो एकाकीपणा आणि त्याच्या कुशीत वाहणारे हे अश्रू.

कधी लहान मुलाच्या निरागस डोळ्यांतून गालावर ओघळणारा अश्रू असतो, तर कधी मोठ्या व्यक्तीच्या हृदयात दाटून येणारा. लहान मूल कोणाला तरी शोधत असतं, त्याच्या सुरक्षिततेच्या शोधात असतं, तर मोठी माणसं कोणालाही न दाखवता, आतल्या आत तुटून जात असतात. दोन्हींच्या वेदना वेगळ्या असल्या, तरी त्यांची भाषा मात्र एकच असते—"समजून घ्या, फक्त एकदाच समजून घ्या!"
दुःखाचे कितीही आवरण चढवले तरी अश्रूंची प्रामाणिकता लपवता येत नाही. चेहऱ्यावर हास्य असलं, तरी डोळ्यांत साठलेले थेंब खूप काही सांगून जातात. कधी कधी ते शब्दांपेक्षाही मोठं सत्य सांगतात.

कोणासाठी वाहिलेले अश्रू कधीही खोटे नसतात. मनाच्या खोल कप्प्यात साठलेली भावना जेव्हा ओघळते, तेव्हा ती पाण्याचा थेंब नसतो, तर हृदयाची वेदना असते. आणि या वेदनेला खोटी ठरवता येत नाही, कारण ती कुणालाही न दिसता सुद्धा जगाच्या सत्याहून जास्त खरी असते.

शेवटी...

कोणीतरी विचारेल, "हे अश्रू नक्की काय सांगतात?"
तर उत्तर फक्त एवढंच—"मी एकटा आहे...!"

एकाकी अश्रू साक्षीदार नसतात, पण तरीही ते कधीच खोटे नसतात...

टिप्पण्या